"जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल", मुख्यमंत्री धामी यांनी योग दिनानिमित्त दिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:03 PM2023-06-21T20:03:06+5:302023-06-21T20:08:37+5:30
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जागेश्वर धाम येथे जाऊन राज्यात योगाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकसित होणार असल्याचे प्रतिपादन केले.
देहरादून : आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी योग दिनानिमित्त वेगवेगळी योगासने करून तंदुरूस्त राहण्यासाठी योग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तउत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जागेश्वर धाम येथे जाऊन राज्यात 'योगा'च्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकसित होणार असल्याचे प्रतिपादन केले.
दरम्यान, मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मोदी यांनी विकासासाठी नव्या रत्नांमध्ये समाविष्ट केलेले तिसरे रत्न मानखंड क्षेत्र निवडले असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम अल्मोडा येथील जागेश्वर धाम येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विशेष पुढाकाराने योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
"जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल"
यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, 'मानस मंदिर माला' या मिशनच्या माध्यमातून सरकार कुमाऊंमधील प्राचीन मंदिरांमध्ये विविध सुविधा विकसित करत आहे. जागेश्वर धामपासून या योजनेची सुरुवात होत असून जागेश्वर धाम हे योग ध्यान आणि आध्यात्मिक चेतनेचे केंद्र बनवण्यात येणार आहे.
योग हा ज्ञानाच्या रूपाने लाभलेला वारसा - धामी
तसेच जागेश्वर धाममधील पाच संयोग सांगताना धामी यांनी म्हटले की, योग हा ज्ञानाच्या रूपाने वारसा असून त्याला आपण जपले पाहिजे. "योग हा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवेचा संयोग आहे. उत्तराखंडला प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट बनविण्यासाठी, पुढे नेण्यासाठी राज्यातील जनतेने दररोज एक तास योग करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. दररोज योगासने करा, सूर्योदयापूर्वी उठा आणि स्वत:मध्ये बदल करा, यामुळे औषधांवर होणारा खर्च देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले.
"वसुधैव कुटुंबकम’ संस्कृतीचा मूळ आधार"
आपल्या गौरवशाली सनातन संस्कृतीचा मूळ आधार 'वसुधैव कुटुंबकम' आहे. हेच तत्त्व केंद्रस्थानी ठेवून यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच अनेक जागतिक आव्हाने आणि षड्यंत्रांचा सामना करूनही भारताने मानवी मूल्यांना कधी बाजूला केले नाही. आपल्या या लोककल्याणकारी संकल्पनेचा आधार ही आपली संस्कृती आहे, ज्याचा एक प्रमुख स्तंभ योग आहे. या कारणास्तव योग हा आज जगातील करोडो लोकांच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, जो जगाला भारतीय संस्कृतीशी अधिक खोलवर जोडण्याचे काम करत आहे, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आणखी सांगितले.