नागपूर : चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे. या भागाचे चिन्हांकन झाले नसल्यामुळे असे प्रकार घडत असतात, मात्र चीनने जाणूनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले.रावत यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. याअगोदर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मी एक संघ स्वयंसेवक असून, नागपूर माझी प्रेरणाभूमी आहे. नागपुरात राष्ट्रीय कर्करोग केंद्राला भेट देण्यासाठी आलो होतो. त्यामुळे सरसंघचालकांना स्वयंसेवक म्हणून भेटत आहे. उत्तराखंडमध्येदेखील टाटा समूहाच्या मदतीने कर्करोग केंद्र निर्माण करत असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत आणि सरसंघचालक भागवत यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:01 AM