देहरादून - उत्तराखंडात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं दमदार विजय मिळवला. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. 18 मार्च 2017ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री रावत यांनी गेल्या 11 महिन्यात केवळ पाहुणाचारावर जवळपास 68 लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून मागण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाब उघडकीस आली आहे.
18 मार्च 2017 रोजी उत्तराखंड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पाहुण्यांच्या स्वागतावर किती रुपये खर्च करण्यात आला आहे?, याबाबतची माहिती देण्याची मागणी हल्द्वानी येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते हेमंत गौनियो यांनी माहिती अधिकारातून केली होती.
दरम्यान, याबाबत माहिती अधिकारातून समोर आलेल्या पाहुणचा-याच्या खर्चाचा आकडा हा आश्चर्यचकीतच करणारा आहे. ''मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 18 मार्च 2017ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पाहुण्यांच्या चहापानावर एकूण 68 लाख 59हजार 865 रुपये खर्च करण्यात आला आहे'', असे उत्तर माहिती अधिकारातून हेमंत गौनिया यांना देण्यात आले. त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे 11वे मुख्यमंत्री आहेत. रावत मंत्रिमंडळात नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 70 पैकी 57 जागांवर विजय मिळवला होता.