चमोली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी मुसळधार पावसानंतर पांगटी गावात जनजीवन विस्कळीत झालं आहे. याशिवाय, चमोली जिल्ह्यातील नारायण बगड थराली महामार्गही बंद झालाय. तसेच, नाल्यातून पाण्यासोबत वाहत आलेल्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठं नुकसान झालंय. अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या ढगफुटीमुळे बीआरओ मजुरांच्या घरांचे नुकसान होण्यासोबतच अनेक वाहनंही ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. हवामान विभागाने राज्यात 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, धगफुटीची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच, पावसामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात झाल्याचेही वृत्त आहे, पण अपघातात झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची दखल घेतली असून, प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.