देहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये धमाकेदार विजय मिळला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहतोडी यांना ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पुष्करसिंह धामी यांनी चंपावतच्या पोटनिवडणुकीत ५८ हजार २५८ मतं मिळवली. तर काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहतोडी यांना केवळ ३२३३ मते मिळाली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र त्या निवडणुकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खटिमा मतदारसंघातून पराभूत झाले होते. पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडेच सोपवले होते. दरम्यान, चंपावत मतदारसंघातील भाजापाचे आमदार कैलाश गहतोडी यांनी राजीनामा देत पुष्कर सिंह धामींसाठी मतदारसंघ मोकळा केला होता.
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुष्करसिंह धामी यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र धामींच्या झंझावातासमोर काँग्रेसची डाळ शिजली नाही. या निवडणुकीत धामी यांना ५८ हजार २५८ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार निर्मला गहतोडी ३२३३ मते मिळाली. त्यामुळे पुष्कर सिंह धामी यांचा ५५ हजारांहून अधिक मतांनी विजय झाला. काँग्रेस उमेदवार निर्मला गहतोडी यांच्यासह इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. ३१ मे रोजी चंपावत मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.\
या विजयानंतर पुष्कर सिंह धामी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. या पोटनिवडणुकीत मतांच्या माध्यमातून केलेल्या प्रेम आणि आशीर्वादाच्या वर्षावासाठी मी आभारी आहे, माझं मन भावूक झालं आहे. मी निशब्द झालो आहे, असं पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चंपावतच्या पोटनिवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्कर सिंह धामी यांचे आभार मानले आहेत.