Uttarakhand New CM : उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण होणार?, 'ही' नावे शर्यतीत; राजकीय हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:25 PM2022-03-14T13:25:53+5:302022-03-14T13:27:54+5:30
Uttarakhand : पुष्कर सिंह धामी, धनसिंग रावत, सतपाल महाराज, रितू खंडुरी, गणेश जोशी यांच्यासह अनेक नावांचा या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समावेश आहे.
भाजपकडून उत्तराखंडचे निरीक्षक म्हणून धर्मेंद्र प्रधान आणि पीयूष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते 19 मार्च रोजी डेहराडूनला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दुसऱ्या दिवशी उत्तराखंडमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पुष्कर सिंह धामी, धनसिंह रावत, सतपाल महाराज, रितू खंडुरी, गणेश जोशी यांच्यासह अनेक नावांचा या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समावेश आहे. पुष्कर धामी विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही अनेक आमदारांनी धामी यांच्या बाजूने जागा रिकामी करून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला लागली आहे.
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्याची सत्ता पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सोपवली. त्रिवेंद्र सिंह रावत आणि तीरथ सिंह रावत यांच्यानंतर पुष्कर सिंह धामी यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले होते. पुष्कर सिंह धामी हे गेल्या 5 वर्षात भाजपचे तिसरे मुख्यमंत्री होते. मागील दोन मुख्यमंत्र्यांपैकी एकाला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला असता, तर भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकला नसता, असे पक्षाच्या अनेक नेत्यांनी उघडपणे मान्य केले होते. त्यामुळे चौथ्यांदा मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान भाजपसमोर आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेने अनेक नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. नवीन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक चेहरे आणि दावेदार आहेत, पण पुष्कर सिंह धामी अजूनही चर्चेत आहेत.
मी माझी जबाबदारी पार पाडली - धामी
केंद्रातील काही मोठे नेते पराभूत पुष्कर सिंह धामी यांच्या बाजूने उभे असून, त्यांना पुन्हा निवडणूक लढवून मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाठिंबा देत आहेत. तर यादरम्यान स्वत: पुष्कर सिंह धामी हे सुद्धा इशाऱ्याद्वारे आपला दावा मांडत आहेत. निवडणुकीत का पराभव झाला, याचा खुलासा पुष्कर सिंह धामी यांनी केला आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले, "मी माझ्या मतदारसंघात प्रचारावेळी कमी वेळ दिला. मला सरकार आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती, मी कधीही कोणते पद मागितले नाही, माझ्यावर जी जबाबदारी आली होती ती मी पूर्ण केली आहे."
भाजपसमोर आव्हान काय?
उत्तराखंडमध्ये स्वत: भाजप नेते सांगत आहेत की, एकूण सहा आमदारांनी पुष्कर सिंह धामी यांना आपली जागा सोडण्याची ऑफर दिली आहे. पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा पाठिंबा नक्कीच दिलासा देणारा आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्रीय हायकमांडने घेणार आहे. एकाच टर्ममध्ये तीन मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपने यावेळी असा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे, जो मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा जिंकण्याचे टारगेट पूर्ण करू शकेल.