नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत होती. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रावत चर्चेत आले आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. वाराणसीत (Varanasi) देखील कुंभमेळा (Kumbh) होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या काळत महाकुंभचे आयोजन करणं बरोबर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी तीरथ सिंह रावत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते पूर्णपणे बरे झाले असून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. याच दरम्यान त्यांनी "महाकुंभ 12 वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात. मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि 12 वर्षातून एकदाच होतो. हरिद्वार, वाराणसी आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे" असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे. खरं कुंभमेळा हा हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिकमध्ये होतो. मात्र रावत यांनी वाराणसीमध्ये होत असल्याचं म्हटलं आहे.
"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम
"आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला. रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं. ट्विटरवर RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होताना पाहायला मिळाला.
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."
तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच घातली फाटकी जीन्स?; जाणून घ्या, 'त्या' फोटोमागचं नेमकं सत्य
"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती.