काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीची मोठी कारवाई; कोण आहेत हरक सिंह रावत?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:22 AM2024-02-07T10:22:29+5:302024-02-07T10:47:59+5:30
Harak Singh Rawat : मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात दिल्ली, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये ईडीचे हे छापे टाकले जात आहेत.
उत्तराखंडचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरक सिंह रावत आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित हे छापे उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमधील 12 हून अधिक ठिकाणी टाकण्यात आले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात दिल्ली, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये ईडीचे हे छापे टाकले जात आहेत. उत्तराखंडचे माजी वनमंत्री हरक सिंह रावत यांच्याशी संबंधित एका घोटाळ्याप्रकरणी सुमारे 12 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
डेहराडूनमधील डिफेन्स कॉलनी येथील निवासस्थानावर ईडीचे पथक छापेमारी करत आहे. केंद्रीय एजन्सीने माजी मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवरही कारवाई केली आहे. ईडीने फॉरेस्ट लँड स्कॅमप्रकरणी कारवाई केली असून ही कारवाई पीएमएलए अंतर्गत करण्यात येत आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये विजिलेन्स विभागाने हरक सिंह यांच्यावरही कारवाई केली होती.
कोण आहेत हरक सिंह रावत?
2016 मध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्या विरोधात बंड करणाऱ्या आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या 10 आमदारांमध्ये हरक सिंह रावत यांचा समावेश होता. परंतु 2022 मध्ये हरक सिंह रावत यांना भाजपाने पक्षातून काढलं, त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरक सिंह रावत यांच्यासोबत त्यांची सून अनुकृती गुसाई यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.