देहरादून : उत्तराखंडमधील राजकीय युद्ध आता राष्ट्रपती भवनाच्या दारी पोहोचले आहे. भाजपने हरीश रावत यांचे सरकार बडतर्फ करण्याची मागणी केली असतानाच काँग्रेसने केंद्राकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. उत्तराखंडमध्ये राजकीय शक्तिप्रदर्शन एक आठवड्यावर आले असताना माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा, पक्षाचे संयुक्त सचिव अनिल गुप्ता यांच्यासह नऊ आमदारांची काँग्रेसने हकालपट्टी केल्यामुळे राज्य सरकारमधील राजकीय संकट वाढले असतानाच भाजप आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी राष्ट्रपतींची भेट घेत राजकीय वादाकडे लक्ष वेधलेआहे. भाजपने विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मार्च काढत शक्तिप्रदर्शन केले. उत्तराखंडचे विधानसभाध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांच्यावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. ते स्वत:च्या पदाप्रमाणे नव्हे तर मुख्यमंत्र्याच्या एजंटसारखे काम करतात, असा आरोप प्रदेश भाजपचे प्रवक्ते मुन्नासिंग चौहान यांनी केला. दरम्यान, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना सादर केला, (वृत्तसंस्था)राजकीय अस्थैर्य निर्माण करण्यासाठी भाजप सत्ता आणि बाहुबळाचा वापर करीत आहे. हे राज्यासाठी चांगले नाही. त्यामुळे दरवर्षी नवा मुख्यमंत्री दिसू लागेल. या राज्यातील जनतेचे स्वप्न त्यामुळे धुळीला मिळेल. - हरीश रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड.
उत्तराखंडचा वाद आता राष्ट्रपतींकडे
By admin | Published: March 22, 2016 3:22 AM