नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीने पक्षाचे नेते हरक सिंह रावत यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. हरक सिंह रावत यांनी कोणासाठी पक्षासोबत वैर घेतलं याची चर्चा सध्या सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेसाठी हरक सिंह रावत यांनी पक्षाकडे तिकीटासाठी मागणी केली होती. परंतु स्थानिक नेतृत्व ते देण्यास तयार नसल्याने रावत यांनी थेट दिल्ली गाठली. परंतु काहीच हाती लागलं नाही.
उत्तराखंडच्या लँसडाऊन जागेवरुन अनुकृती गुसाईं हिच्यासाठी हरक सिंह रावत दावा करत होते. पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तरी लँसडाऊनची जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद अनुकृतीच्या मागे असल्याचं रावत सांगतात. कुठल्याही पक्षाकडून तिने उमेदवारी लढवली तरी राज्यासह देशपातळीवर पक्षाचं आणि विधानसभेच्या जागेचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास हरक सिंह रावत यांनी व्यक्त केला.
भाजपाने निलंबित केलेले नेते हरक सिंह रावत म्हणतात की, मोठमोठ्या राजा-महाराजांनीही काही असे निर्णय घेतले ज्यामुळे ते त्यांच्या विनाशाचं कारण बनले. भाजपानेही हरक सिंह रावत यांना ६ वर्षासाठी पक्षातून काढलं असं त्यांनी सांगितले. हरक सिंह रावत यांच्यावर पक्षातंर्गत होणाऱ्या कारवाईमागे सून अनुकृती गुसाईचं कारण असल्याचं बोललं जात आहे. अनुकृतीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची इच्छा हरक सिंह रावत यांची होती. स्थानिक नेतृत्वाने त्यांना विरोध केल्यानंतर रावत यांनी दिल्ली गाठली. परंतु त्याठिकाणीही पदरी काहीच पडलं नाही. अखेर पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
हरक सिंह रावत यांनी भावूक होत भाजपावरच हल्लाबोल केला आणि पडद्यामागून सुरु असलेल्या हालचालींना पुढे आणलं. अनुकृती गुसाईं नक्की कोण आहे जिच्यासाठी हरक सिंह रावत यांनी भाजपाशीही पंगा घेतला. तर अनुकृती गुसाई ही एक मॉडेल आणि टीव्ही प्रेजेंटर आहे. २५ मार्च १९९४ रोजी तिचा जन्म झाला. २०१३ मध्ये मिस इंडिया दिल्ली खिताब तिने जिंकला होता. तर मिस इंडिया स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर होती. त्याशिवाय २०१४ मध्ये मिस इंडिया पैसॅफिक वर्ल्ड आणि २०१७ मध्ये मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनलमध्ये तिने भारताचं प्रतिनिधीत्व केले आहे. ती महिला आणि बाल कल्याण संस्थेची अध्यक्षही आहे.
माजी मंत्री हरक सिंह रावत आणि दिप्ती रावत यांचा मुलगा तुषित रावतसोबत अनुकृतीचं लग्न झालं आहे. २०१८ मध्ये रावत आणि गुसाई यांच्यात नातं जमलं. अनुकृती लँसडाऊनमध्ये हरक सिंह रावत यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळते. तुषित शंकरपूर स्थित दून इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये काम करतो. त्याला राजकारणात रस नाही. परंतु अनुकृती राजकारणात हरक सिंह रावत यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे. अनुकृतीने याआधीच निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे हरक सिंह रावत यांच्यावर दबाव आला. त्यांनी लँसडाऊन जागेवरुन भाजपाची उमेदवारी अनुकृतीला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र त्यांना यश आलं नाही.