नवी दिल्ली: पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये उत्तराखंड राज्याचाही समावेश आहे. उत्तराखंड भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. इतकेच नव्हे, तर भाजपवर मुख्यमंत्री बदलण्याचीही वेळ आली होती. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखू शकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच उत्तराखंड भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपला राज्यात ६० हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला आहे.
उत्तराखंडमधील मुख्यमंत्री बदलण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यासत आल्यावर पुष्कर सिंह धामी म्हणाले की, काहीवेळेस अशा परिस्थिती निर्माण होतात. पक्ष तोच आहे, सरकारही तेच आहे. फक्त चेहरा बदलण्यात आला आहे. सरकारीच धोरणे, नीती त्याच आहेत. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. लोकशाही मार्गाने चालणारा आमचा पक्ष आहे, असे धामी यांनी स्पष्ट केले. आजतकच्या पंचायत आजतक या कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी बोलत होते.
पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडतोय
पहाडी राजकारण कठीण आहे, यावर धामी यांनी सांगितले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण सक्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न मी करतोय. आमचे सरकार ५ वर्षांपासून कामकाज पाहात आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रासाठी काम केले आहे. आम्ही केवळ योजना तयार केल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षातही आणल्या. हाच आमच्या आणि अन्य सरकारमध्ये मोठा फरक आहे, असेही धामी यांनी नमूद केले. सांगण्यासाठी अनेक प्रकारचे आकडे सादर करता येऊ शकतील. मात्र, गेल्या ५ महिन्यांपासून जे काम केले आहे, ते सांगण्याचाही गरज नाही. जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली आहेत, असे धामी म्हणाले.
दरम्यान, विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आधारहीन आहेत. केदारनाथ पुनर्निमाणाचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झाले. काशी कॉरिडॉरचेही काम पूर्ण झाले आहे. याशिवाय बद्रीनाथ धामचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे, असेही पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.