रवी टालेहल्द्वानी : कुमाऊं विभागातील दोन प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत एकप्रकारे अस्तित्वाचीच लढाई लढत असून, मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना, दोघांसाठीही विजय सोपा नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री धामी आणि हरीश रावत यावेळी पराभूत झाल्यास दोघांचीही राजकीय कारकीर्दच धोक्यात येणार आहे. ही शेवटची निवडणूक असल्याचे सूतोवाच रावत यांनी स्वत:च केले असल्यामुळे या निवडणुकीतील पराभव त्यांच्या राजकीय वाटचालीवर पूर्णविराम लावणाराच ठरेल.
धामी तरुण असल्यामुळे एखाद्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द जरी संपुष्टात येणार नसली तरी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असताना पदरी पडलेला पराभव त्यांना शर्यतीत खूप मागे ढकलणारा ठरेल.
विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाविद्यमान मुख्यमंत्र्यांची ही स्थिती असताना, पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत असलेले कॉंग्रेसचे बडे नेते हरीश रावत यांनाही विजयासाठी बरेच कष्ट उपसावे लागत आहेत. संपूर्ण राज्याची जबाबदारी असतानाही रावत सायंकाळी कोणत्याही परिस्थितीत नैनिताल जिल्ह्यातील लालकुंआ मतदारसंघात परत येतातच, ही एकच बाब त्यांचाही विजय सोपा नसल्याचे स्पष्ट करते. उत्तराखंडमध्ये हरदा या लाडक्या नावाने ओळखले जात असलेल्या रावत यांनी शेवटच्या राजकीय डावासाठी लालकुंआची निवड केल्याने जसे अनेकजण खूश आहेत, तसेच अनेकांना त्यांचे वारंवार मतदारसंघ बदलणे आणि एका महिला कार्यकर्त्याची उमेदवारी हिसकावून घेणे आवडलेले नाही.
ती महिला कार्यकर्ता आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्याने रावत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप उमेदवारालाही बंडखोराचा सामना करावा लागत आहे, ही बाब मात्र रावत यांच्यासाठी काहीशी दिलासादायक आहे.