Uttarakhand Election Opinion Poll: सत्ता भाजपची, पण मुख्यमंत्री काँग्रेसचा; 'या' राज्यात मतदारांची भलतीच इच्छा, नेते चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:10 PM2021-10-08T22:10:18+5:302021-10-08T22:10:48+5:30
Uttarakhand Election Opinion Poll: निवडणूकपूर्व सर्वेक्षण सांगते, राज्यात भाजपची सत्ता कायम राहणार; पण मुख्यमंत्रिपदी हवा काँग्रेस नेता
देहरादून: पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या साडे चार वर्षांत भाजपनं तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी टाळण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री बदलले गेले. त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. त्यातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
साडे चार वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपला पराभवाची चिंता सतावत असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र सर्वेक्षणातील आकडेवारीतून याच्या अगदी विरुद्ध चित्र समोर आलं आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल, असं आकडे सांगतात. विधानसभा निवडणुकीत भाजपला ४५ टक्के, तर काँग्रेसला ३४ टक्के मतं मिळू शकतात. आम आदमी पक्षाला १५, तर अन्य पक्षांना ६ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.
कोणाला किती जागा?
उत्तराखंड विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. यापैकी ४२ ते ४६ जागा भाजपला मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला २१ ते २५ आणि आपला ० ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना ० ते २ जागा मिळू शकतील.
मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?
उत्तराखंडातील जनतेनं या वर्षात ३ मुख्यमंत्री पाहिले. देवभूमीत असं अनेकदा घडलं आहे. काँग्रेस, भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. राज्यात भाजपचं सरकार येईल असं सर्व्हेतील आकडे सांगतात. मात्र मुख्यमंत्रीपदी जनतेनं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना पसंती दिली आहे. रावत मुख्यमंत्री व्हावेत, असं ३७ टक्के लोकांना वाटतं. तर पुष्कर धामीच मुख्यमंत्रिपदी कायम राहावेत, असं वाटणाऱ्यांचं प्रमाण २४ टक्के आहे.