डेहराडून : नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील २०३ कर्मचारी बेपत्ता असून १८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे.जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात ३४ कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या ३०० जवानांनी बचावकार्य हाती घेतले आहे. यासाठी इस्रो, डीआरडीओ या संस्थाही मदत करीत असल्याचे रावत म्हणाले.बोगद्यात साचलेला चिखल, दगडमातीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक कामगाराला वाचविण्यात यश येईल, अशी आशा आयटीबीपीचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी व्यक्त केली. यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रांनी दर्शविली मदतीची तयारीउत्तराखंडमध्ये जलप्रलयामुळे बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी तसेच धरणाच्या बोगद्यामध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी मदत करण्याची तयारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी दाखविली आहे.आता तरी जागे व्हा : ‘चिपको’चे आवाहनहिमालयातील जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर नासाडी सुरू आहे. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये मोठी हानी झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांनी जागे व्हावे, असे चिपको आंदोलनाचे नेते चंडीप्रसाद भट्ट यांनी म्हटले आहे. उत्तराखंडच्या पाठीशी देश उभा : राहुल गांधीउत्तराखंडच्या पाठीशी सारा देश उभा आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांना शोधण्याच्या बचावकार्यात येत्या काही दिवसांत कोणतेही अडथळे येता कामा नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Uttarakhand Glacier Burst: अद्यापही २०३ जण बेपत्ता; १८ जणांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 3:14 AM