चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या लोकांना नदीपासून लांब राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने टिहरी डॅमपासून पाण्याचा प्रवाह रोखला जात आहे. रुद्रप्रयागमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे. ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी लोकांनी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांची गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
चमोलीत हिमकडा कोसळल्यानंतर उन्नाव जिल्ह्याधिकाऱ्यांनी गंगा नदीजवळ असलेल्या ३५० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कन्नोज जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट आहे. येथील जिल्ह्याधिकाऱ्यांनी यासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली असून गंगा नदीच्या किनारी असलेल्या लोकांना अलर्ट केले आहे.
फर्रुखाहादमध्येही गंगा नदीच्या प्रवाहावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत, सध्या नदीच्या पाण्याची पातळी सामान्य आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात नदीपासून कोणताही धोका नाही. मात्र, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर बिजनौरमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने पोलीस तैनात केले आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील चमोली येथे आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऋषीगंगा प्रकल्पाला मोठी हानीतपोवन रैणी परिसरात हिमकडा तुटल्याने ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी पोहोचली आहे. नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावं, असं आवाहन चमोली पोलिसांनी केलं आहे.
अमित शहांनी दिलं मदतीचं आश्वासनकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची दखल घेतली असून आवश्यक अशी सर्व मदत केंद्र सरकार करणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री रावत यांच्याशी बोलणं झालं असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही ते म्हणाले. देवभूमीतील लोकांना वाचवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचं शहा म्हणाले.
उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाइन नंबर जारीउत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 1070 आणि 9557444486 हे हेल्पलाइन क्रमांक आहेत. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 9557444486 हा हेल्पालाईन नंबर जारी करण्यात आला आहे.