जोशीमठ (उत्तराखंड) : जिवंत राहण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाच्या मोबाइल फोनचे नेटवर्क काम करू लागले व त्यातून त्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला. त्यांनी तपोवन या भूमिगत बोगद्यातून त्यांना वाचविले. हा बाेगदा चामोलीत आहे.“बोगद्यातून बाहेर या, असे लोक आमच्यावर ओरडत होते, हे आम्ही ऐकले, परंतु आम्ही काही करायच्या आधीच पाण्याचा मोठा लोंढा आणि चिखल आमच्यावर आदळला,” असे तपोवन वीज प्रकल्पाचे वाचविण्यात आलेले कामगार लाल बहादूर म्हणाले. बहादूर यांच्यासह त्यांचे ११ सहकारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चामोली जिल्ह्यात भूमिगत बोगद्यातून वाचविले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे लोक शेवटच्या व्यक्तीला वाचविण्यात आले, तेव्हा जवळपास सात तास (सकाळी दहा ते सायंकाळी पाच) तेथे अडकून पडले होते. आयटीबीपीने या मोहिमेचा रेकॉर्डेड व्हिडीओ प्रसारमाध्यमांना दिला. या लोकांवर सध्या जोशीमठ येथील आयटीबीपीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडली तेथून हे रुग्णालय २५ किलोमीटरवर आहे. ११ मृतदेह सापडले असून, २०२ जण बेपत्ता आहेत. पाण्याचा जोरदार प्रवाह बोगद्यात आला, तेव्हा आम्ही ३०० मीटर्स खोलवर होतो. आम्ही तर अडकून पडलो होतो, परंतु आयटीबीपीने आम्हाला वाचविले, असे नेपााळचा रहिवासी बसंत याने सांगितले. धाक (चामोली) खेड्यातील एक कामगार तपोवन प्रकल्पात कामाला होता. तो रुग्णालयातून म्हणाला की, “आम्ही तर आशा सोडली होती. तेव्हा आम्हाला थोडासा प्रकाश दिसला. लगेच आमच्यापैकी एकाला त्याच्या मोबाइलला नेटवर्क मिळाल्याचे दिसले. त्याने आमच्या महाव्यवस्थापकांना परिस्थितीची माहिती दिली,” प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कळविले. आयटीबीपीची तुकडी, दोरखंड, पुलीज व कॅराबाइनर्स घेऊन आली आणि तिने रविवारी सायंकाळी बोगद्यातून लोकांना बाहेर काढले आणि ही मोहीम यशस्वी केली.
Uttarakhand Glacier Burst: वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:42 AM