ऑनलाइन लोकमत
डेहरादून, दि. २५ - उत्तराखंड विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यापूर्वीच मुख्यमंत्री हरीश रावत (काँग्रेस) यांचे सरकार वादात सापडले आहेत. ' क्रिकेटपटू विराट कोहलीची २०१५ साली उत्तराखंडच्या ब्रॅड अॅम्बॅसेडरपदी नियुक्ती झाली. त्यावेळी पर्यटन विभागाच्या ६० सेकंदांच्या जाहिरातीत काम केल्याबद्दल हरीश रावत सरकारने पूरग्रस्तांसाठी जमवण्यात आलेल्या निधीतून कोहलीला ४७.१९ लाख रुपये दिले होते' अशी माहिती आरटीआयच्या अहवालातून समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भाजपाचे सदस्य असलेल्या अजेंद्र अजय यांनी यासंबंधी याचिका दाखल करून प्रश्न विचारला होता. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरातूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र कोहलीच्या एजंटने पैसे मिळाल्याचे वृत्त नाकारले आहे. सरकारतर्फे (आम्हाला) कोणतेही पैसे देण्यात आले नव्हते, असे त्याने स्पष्ट केले.
तर मुख्यमंत्री हरीश रावत यांचे मीडिया सल्लागार सुरेंद्र कुमार यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. ' पर्यटन क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतं. त्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्रांचे प्रमोशन करण्यासाठी, एखादा प्रसिद्ध चेहरा वापरला तर त्यात काय चुकलं'? असा सवाल त्यांनी विचारला. 'जे काही व्यवहार झाले ते कायदेशीररित्याच करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व आरोप निराधार आहेत. केदारनाथचा विकास करणं हीच आमच्या सरकारची प्राथमिकता राहिली आहे, हे लोकांनाही माहीत आहे. भाजपाला निवडणुकीत आपला पराभव होताना दिसत असल्यानेच ते नैराश्यातून असे आरोप करताना दिसत आहेत' अशा शब्दांत कुमार यांनी भाजपाचे आरोप फेटाळून लावत त्यांना फटकारले.
विराट कोहलीच्या एजंटने पैसे मिळाल्याचे नाकारले, याबद्दल कुमार यांना विचारणा करण्यात आली असता ' आपण याप्रकरणी संबंधित विभागाकडे चौकशी करू' असे त्यांनी सांगितले.