चारधाम यात्रेवरील बंदी हायकोर्टाने हटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:23 AM2021-09-17T09:23:03+5:302021-09-17T09:23:38+5:30
कोरोना साथीमुळे चारधाम यात्रेवर घातलेली बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने उठविली आहे.
डेहराडून : कोरोना साथीमुळे चारधाम यात्रेवर घातलेली बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी उठविली आहे. त्याबरोबरच प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. यंदा चारधाम यात्रेमध्ये दरदिवशी केदारनाथ येथे ८००, बद्रीनाथ येथे १२००, गंगोत्री येथे ६०० व यमुनोत्री येथे ४०० भाविकांनाच जाता येणार आहे. न्यायालयाने बंदी उठविल्यामुळे आता लवकरच चारधाम यात्रा सुरू केली जाईल, असे उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी उत्तराखंड सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली नसल्याचे मत व्यक्त करीत उत्तराखंड उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. चामोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी १ जुलैपासून चारधाम यात्रा सुरू करण्याच्या उत्तराखंड सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने २८ जून रोजी स्थगिती दिली होती. त्या निर्णयाला उत्तराखंडच्या राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.