'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:42 PM2023-01-06T20:42:02+5:302023-01-06T20:42:54+5:30

उत्तराखंडमधील जोशीमठ शहरात अचानक घरांना आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. यामुळे घाबरलेल्या अनेकांनी गाव सोडले आहे.

Uttarakhand Joshimath News | Big decision on 'falling' joshimath; Immediate vacate order, government to pay 6 months house rent | 'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

googlenewsNext

Joshimath Falling: उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ शहरातील भिंतींना आणि रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. घरांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी वाहत आहे. अनेक भागात भूस्खलन आणि कोसळलेल्या भिंतींमुळे लोकांना भीतीत जगावे लागत आहे. ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत किंवा जमिनीला तडे गेले आहेत, त्यांनी घरे सोडून पळ काढला आहे.

याबाबत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यात अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षित ठिकाणी तात्काळ मोठे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जोशीमठमध्ये क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे आणि धोक्याचे क्षेत्र त्वरित रिकामे करून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

सरकार 6 महिन्यांचे भाडे देईल
या बैठकीनंतर जोशीमठ परिसरातील बाधितांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रशासनाने बाधित कुटुंबांना 6 महिन्यांचे घर भाडे देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची घरे धोक्यात आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत, त्यांना पुढील 6 महिने भाड्याच्या घरात राहण्यासाठी मदत म्हणून प्रति कुटुंब ₹ 4000 दिले जातील. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

500 हून अधिक घरांना तडे
आत्तापर्यंत 500 हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्याचबरोबर अनेकांनी स्वतःहून घर सोडले आहे. संपूर्ण शहर भयभीत झाले आहे. विशेष पथक संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहे. SDRF, NDRF, पोलिस सुरक्षा दलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बाधित भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या भूवैज्ञानिक पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, प्रशासनाचे पथक घटनास्थळी सतत पाहणी करत आहे. आतापर्यंत 50 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे काम थांबले
एनटीपीसी पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यातील कामही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बीआरओ अंतर्गत हेलांग बायपास बांधकाम, एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधकाम आणि महापालिका क्षेत्रातील बांधकामांवर आगाऊ आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यासोबतच जोशीमठ-औली रोपवेचे कामही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे.

Web Title: Uttarakhand Joshimath News | Big decision on 'falling' joshimath; Immediate vacate order, government to pay 6 months house rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.