सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण भाग्यवान मोजकेच असतात, ज्यांची स्वप्ने पूर्ण होतात. बाकीचे लोक हताश होऊन त्यांना रोजगाराची दुसरी साधने शोधावी लागतात. हल्दवानी येथील इंजिनिअर पंकज पांडेही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होता, पण नोकरी न मिळाल्याने त्याने असं काही केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंजिनिअरिंगची पदवी बाजूला ठेवून पंकजने शहरात चहाचा स्टॉल सुरू केला आहे.
पंकजला यामुळे आता लोक 'इंजिनिअर चायवाला' या नावाने ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पांडे राणीखेत येथील रहिवासी आहे. त्याने उत्तराखंडच्या गरुड सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पंकजने दिलेल्या माहितीनुसार, त्याला खासगी क्षेत्रात नोकरीच्या अनेक ऑफर आल्या, पण त्याला फक्त आणि फक्त सरकारी नोकरी हवी होती.
अनेक प्रयत्न करूनही पंकजला सरकारी नोकरी मिळू शकली नाही आणि त्यांचे वय वाढतच गेले. कुटुंबीयांना त्याची खूप काळजी वाटत होती, अशा परिस्थितीत पंकजने सरकारी नोकरीची तयारी करत स्वतःचा चहाचा स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने घरातील सदस्यांचे मन वळवले आणि सांगितले की त्याला स्वतःचा 'इंजिनिअर चायवाला' नावाचा चहाचा स्टॉल सुरू करायचा आहे. आता पंकजने हल्द्वानीमध्ये चहाचा स्टॉल सुरू केला आहे.
पंकज 10 रुपये ते 25 रुपये प्रति कप चहा विकतो, जो लोकांना खूप आवडतो. पंकज चहा विकून दिवसाला 400 ते 500 रुपये कमावतो. "सरकारने अनेक विभागात मेकॅनिकल इंजिनिअरची पदे रद्द केली आहेत. माझे वयही सातत्याने वाढत होते. अशा परिस्थितीत मी स्वत: निर्णय घेतला आणि स्वतःचा चहाचा स्टॉल सुरू केला" असं त्याने म्हटलं आहे. पंकजने चहाचा स्टॉल उघडून कमाई सुरू केली असली तरी सरकारी नोकरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"