उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सरकारमध्ये शपथ घेणारे मंत्री सौरभ बहुगुणा यांचा स्मार्टफोन शपथविधी सोहळ्यादरम्यान हरवल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडची राजधानी देहराडूनच्या परेड ग्राऊंडवर बहुगुणा पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा फोन होता. पण शपथविधीनंतर फोन आपल्याजवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती फेसबुकवर दिली आहे.
"आज देहरादून परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळ्यादरम्यान माझा मोबाईल फोन (iPhone 13) कुठेतरी पडला आहे. अशा परिस्थितीत तुमच्यापैकी कोणाकडे मोबाईल आला तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर मला संपर्क करा. माझ्या संपर्क क्रमांकावरून कोणताही कॉल आला तर कृपया काळजी घ्या", असं भाजप सरकारचे मंत्री सौरभ बहुगुणा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सौरभ बहुगुणा भाजपच्या तिकीटावर उत्तराखंडच्या सितारगंज विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सौरभ हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे धाकटे सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा हेमवती नंदन बहुगुणा हे माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते.