डेहराडून: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्यापूर्वीच भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्याच्या राजकारणात दलितांचा मोठा चेहरा समजल्या जाणाऱ्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या बदलीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. भाजप नेते यशपाल आर्य यांची पाच वर्षानंतर घरवापसी झाली आहे. यशपाल आर्य हे त्या 9 काँग्रेस आमदारांपैकी एक होते, ज्यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये येताच यशपाल आर्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं तर त्यांचा मुलगा संजीव आर्य यांनाही आमदार करण्यात आलं. निवडणुकीपूर्वीच यशपाल काँग्रेसमध्ये परतल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
कोण आहेत यशपाल आर्य ?69 वर्षीय यशपाल आर्य उत्तराखंडच्या राजकारणातील सर्वात मोठा दलित चेहरा आहेत. 1989 मध्ये यशपाल आर्य पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडुन गेले. उत्तराखंडच्या स्थापनेनंतर 2002 च्या निवडणुकीत ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य झाले. तेव्हापासून यशपाल आर्य प्रत्येक निवडणुकीत जिंकत आले आहेत. यशपाल आर्य हे बाजपूरचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा संजीव आर्य नैनीताल मतदारसंघातून आमदार आहेत.