PM मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध; समजावण्यासाठी पोहोचले CM धामी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:12 PM2021-11-03T15:12:35+5:302021-11-03T15:13:41+5:30
पुजाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दर्शनही घेऊ दिले नव्हते. यानंतर, पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यालाही विरोध करण्याचा निर्णय घेतला...
केदारनाथ- पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला विरोध सुरू झाला आहे. तेथील पुजारी लोक पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला विरोध करत आहेत. यानंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बुधवारी पुजाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांना समजावण्यासाठी केदारनाथ येथे पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी बराच वेळ बंद दाराआड पुजाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे समजते.
खरे तर, दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धनसिंग रावत यांच्यासह भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना केदारनाथमध्ये तीव्र विरोध झाला होता. एवढेच नाही, तर पुजाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दर्शनही घेऊ दिले नव्हते. यानंतर, पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यालाही विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून उत्तराखंड सरकार टेन्शनमध्ये आहे.
पुजारी आणि पंडा समाजाचा विरोध लक्षात घेता, आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी केदारनाथ येथे गेले आणि त्यांनी पुजाऱ्यांसोबोत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात तयारीचीही पाहणी केली.
...म्हणून पुजारी करत आहेत विरोध -
त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने जानेवारी 2020 मध्ये चार धाम देवस्थानम बोर्डाची स्थापना केली होती. यामुळे चार धामसह इतर ५१ मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे गेले होते. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील चार धाम आहेत. तेव्हापासूनच पुजारी आणि पांडा समाज सरकारकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे.
मात्र, धामी यांनी मुख्यमंत्री होताच समिती स्थापन करून अहवालाच्या आधारे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 30 ऑक्टोबरपर्यंतही कोणताच निर्णय न झाल्याने देवस्थान मंडळाचा मुद्दा पुन्हा तापला आणि पुजाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. एवढेच नाही, तर पुजाऱ्यांनी खुद्द पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यालाही विरोध करण्याचे ठरवले आहे. यातच आता, पुजाऱ्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली असून, ते पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे धामी यांनी म्हटले आहे.