रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:20 PM2022-11-14T12:20:09+5:302022-11-14T12:21:08+5:30
रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता.
देहराडून-
बांधकाम पूर्ण होण्याआधीच टोल आकारणी सुरू करणार्या देशातील टोल प्लाझांना स्पष्ट संदेश देत हरिद्वारमधील जिल्हा ग्राहक न्यायालयाने NHAI च्या पुरैनी टोल प्लाझाची देखरेख करणाऱ्या नगीना-काशीपूर प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला टोल आकारलेले १५० रुपये ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता. इतकंच नव्हे, तर टोलनाका देखील अधिकृतपणे लोकांसाठी अद्याप खुला झालेला नव्हता. तरीही टोल आकारणी करण्यात आली होती.
कोर्टाने टोल प्लाझाला याचिका शुल्क आणि विशेष नुकसानभरपाई म्हणून ५.५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाके आकारणे बंद करण्याचे आदेश टोलनाक्याला देण्यात आले आहेत.
३ ऑक्टोबर २०२१ रोजी हरिद्वारचे रहिवासी प्रल्हाद सिंह बिजनौरहून NH-74 मार्गे घरी परतत होते. नांगिया (बिजनौर हद्दीत) येथे नव्यानं उभारलेल्या टोलनाक्यावर त्यांना थांबवण्यात आलं आणि १५० रुपये टोल फी भरण्यास सांगितलं गेलं. ज्यावर त्यांनी आक्षेप घेतला, रस्ता रुंदीकरणाचं काम अद्याप सुरू आहे आणि हा रस्ता अधिकृतपणे लोकांसाठी खुला होणं बाकी आहे. असं असतानाही टोल भरल्यानंतरच वाहनचालकाला तेथून जाऊ देण्यात आलं होतं.
कोर्टात सिंग यांच्या दाव्याला विरोध करताना प्रतिवाद्यांनी कोर्टात युक्तिवाद केला की टोल-प्लाझाशी संबंधित प्रकरणं ग्राहक मंचाच्या कक्षेत येत नाहीत. याशिवाय, हरिद्वार ते नगीना या ७७ किमी आणि नगीना ते काशीपूर या १७० किमी लांबीच्या रुंदीकरणाचं काम दोन टप्प्यात केलं जाईल, असं रस्ता बांधकाम कंपनीनं सांगितलं होतं. त्यात असंही नमूद केलं होतं की आधीच दुसऱ्या मार्गाचं चार-लेन बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि एक नोटिफिकेशन जारी केली आहे. जून २०२१ पासून नांगिया प्लाझा येथे टोल शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, नांगियावर टोल प्लाझा लावण्यात आला होता, जो हरिद्वारकडे जाणारा आणि काशीपूरकडे जाणारा या दोन्ही रस्त्यांसाठी काम करतो. सिंग हे हरिद्वारला निघाले होते आणि टोल प्लाझापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि निर्माणाधीन असलेल्या रस्त्यासाठी टोल आकारण्यात आला.