उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरूच आहे. दुर्घटना होऊन अनेक दिवस झाले असले तरी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात अद्याप यश आलेलं नाही. या बोगद्यात पुष्कर नावाचा एक मजूर देखील अडकला आहे. पुष्करला त्याचा भाऊ विक्रम सिंहशी बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने "भाऊ, मी इथे अडकलेल्या लोकांपैकी एक आहे हे आईला सांगू नकोस" असं म्हटलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उत्तरकाशीतील सिल्कयारा बोगद्याचा काही भाग रविवारी कोसळला, आत अडकलेल्यांमध्ये पुष्करचा समावेश आहे. 25 वर्षीय पुष्करने विक्रम सिंहला सांगितलं की, "मी ठीक आहे. इथे इतरही लोक आहेत… तू आईला खरं सांगितलं तर तिला काळजी वाटेल." चंपावत जिल्ह्यातील छनी गोठ गावात राहणारा विक्रम आपल्या भावाशी बोलल्यानंतर रडला.
"आमच्याकडे बोलण्यासाठी फक्त काही सेकंद होते, म्हणून मी लगेच त्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि बाहेर सुरू असलेल्या बचाव कार्याबद्दल सांगितलं. लहान असल्याने तो आईचा आवडता आहे" असं विक्रमने सांगितलं. मात्र काही शेजाऱ्यांनी अपघाताची माहिती घरी पालकांना दिली आहे. विक्रमच्या म्हणण्यानुसार, अपघाताबाबत समजल्यानंतर पालकांना मोठा धक्का बसला आहे.
"काळजी करू नका, सुरक्षित आहोत, सर्वांना बाहेर काढल्यावरच बाहेर येईन"
काही दिवसांपूर्वी बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह या मजुराने आपल्या मुलाशी वॉकीटॉकीवरून संवाद साधला आहे. सर्व मजुरांची जबाबदारी माझ्यावर असल्याचं ते म्हणाले. सर्वांना बाहेर काढल्यानंतरच मी बाहेर येईन असंही सांगितलं. गब्बर सिंह हे सुपरवायझर आहेत. उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले गब्बर सिंह नेगी यांनी आपल्या मुलाशी संवाद साधला आणि इतर मजूर सुरक्षित असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे पुरेसं अन्न आणि पाणी आहे. आता ते बाहेर येण्याची वाट पाहत आहेत असं म्हणाले.