८० तासांनंतरही मजूर अडकलेले; रेस्क्यूसाठी थायलंड, नॉर्वेची मदत, मोठ्या मशिन्स एअरलिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:33 AM2023-11-16T08:33:15+5:302023-11-16T08:33:23+5:30
भूस्खलनाने बचावकार्यात अडचणी
उत्तरकाशी : ब्रम्हखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा आणि दंदलगावदरम्यानच्या बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी नॉर्वे, थायलंड येथील रेस्क्यू टीम बोलावण्याची तयारी उत्तराखंड सरकारकडून केली जात आहे.
दरम्यान, बचावकार्यासाठी मोठमोठ्या यंत्रणा घटनास्थळापर्यंत आणण्यासाठी हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने एअरलिफ्ट करण्यात येत आहेत; परंतु, पर्यायी बोगद्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी रात्री बोगद्यात स्टीलचे पाइप टाकण्यासाठी ड्रिलिंग करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक भूस्खलन झाल्याने काम थांबविण्यात आले. तसेच त्यासाठी काम करणारी यंत्रणाही क्षतिग्रस्त झाली. २५ टनांच्या यंत्रणा घटनास्थळी आणण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली.
ज्युनिअर फुटबॉल टीमला केले होते रेस्क्यू
जुलै २०१८ मध्ये थायलंडच्या चिंग राय प्रांतातील गुहेत अडकलेल्या ज्युनिअर फुटबॉल टीममधील १२ जणांना रेस्क्यू करण्यात आले होते. सर्व खेळाडू ११ ते १६ वर्ष वयोगटातील होते. त्यांच्यासोबत एक प्रशिक्षकही होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा मजुरांना बाहेर काढण्यासाठी उत्तराखंड सरकार प्रयत्नशील आहे. तसेच नॉर्वे येथे बचावकार्यात तज्ज्ञ असलेल्या एनजीआय एजन्सीचीही मदत घेण्याचे प्रयत्न सरकार पातळीवरून सुरू आहे.
बचावकार्यास विलंब, कामगारांचा रोष
मागील ८० तासांपासून सुरू असलेल्या बचावकार्य अद्याप सुरू आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात विलंब होत असल्याने कामगारवर्गाकडून रोष व्यक्त करण्यात आला. पर्यायी बोगद्यासाठी आणलेली यंत्रणा काम करत नसल्याने कामगारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात आली.
विविध यंत्रणांचीही मदत
उत्तराखंड सरकारकडून बचावकार्यासाठी शक्य ते सर्व पर्याय अवलंबले जात आहे. भारतीय रेल्वे, रेल विकास निगम लिमिटेड, रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड, इरकॉन यासारख्या यंत्रणांची मदत घेतली जात आहे.