रॅट होल एक्सपर्ट्स ते परदेशी इंजीनिअर; 41 कामगारांना वाचवण्यात 'या' लोकांची महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 08:37 PM2023-11-28T20:37:09+5:302023-11-28T20:38:13+5:30

उत्तराखंडच्या बोगद्या दुर्घटनेतील बचावकार्य आज अखेर यशस्वी झाले.

Uttarakhand tunnel collapse: Rat hole experts to foreign engineers; Important role of 'these' people in saving 41 workers | रॅट होल एक्सपर्ट्स ते परदेशी इंजीनिअर; 41 कामगारांना वाचवण्यात 'या' लोकांची महत्वाची भूमिका

रॅट होल एक्सपर्ट्स ते परदेशी इंजीनिअर; 41 कामगारांना वाचवण्यात 'या' लोकांची महत्वाची भूमिका

Uttarakhand tunnel collapse:उत्तराखंडच्या बोगद्या दुर्घटनेतील बचावकार्य आज अखेर यशस्वी झाले. बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची 17 दिवसांनंतर सुटका करण्यात आली. संपूर्ण देशाचे या बचाव मोहिमेवर बारकाईने लक्ष होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी हजर आहेत, तर पीएमओचे अनेक अधिकारी घटनास्थळी नियमितपणे भेट द्यायचे. 

संपूर्ण देश या कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत होता. आज अखेर त्यांची प्रार्थना पूर्ण झाली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि इतर राज्य आणि केंद्रीय संस्था या बचाव मोहिमेत गुंतल्या होत्या. यातील काही लोकांनी या 41 कामगारांच्या बचाव कार्यात मोठी भूमिका बजावली. आज आम्ही या लोकांबद्दल सांगणार आहोत.

आयएएस अधिकारी नीरज खैरवाल
आयएएस अधिकारी आणि उत्तराखंड सरकारमधील सचिव नीरज खैरवाल यांची सिल्क्यरा बोगदा कोसळण्याच्या घटनेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते गेल्या 10 दिवसांपासून बचाव कार्यावर जातीने देखरेख आणि कमांड देत आहेत. खैरवाल बचाव स्थळावरून सीएमओ आणि पीएमओला प्रत्येक अपडेट देत आहेत. 

बोगदा तज्ञ ख्रिस कूपर
ख्रिस कूपर अनेक दशकांपासून मायक्रो-टनेलिंग तज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांना या बचाव कार्यासाठी खास पाचारण करण्यात आले आहे. 18 नोव्हेंबर रोजी ते घटनास्थळी पोहोचले. अशा परिस्थितीत त्यांचा अनुभव खूप प्रभावी ठरला आहे. कूपरने स्वतः काम लवकर पूर्ण करण्याचा आग्रह धरला. ते ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार देखील आहेत.

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त), सदस्य, एनडीआरएफ
सय्यद अता हसनैन, भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि NDRF टीमचे सदस्य आहेत. ते उत्तराखंड बोगद्याच्या दुर्घटनेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या भूमिकेवर देखरेख करत आहेत. लेफ्टनंट जनरल हसनैन पूर्वी भारतीय लष्कर, 15 कॉर्प्सचे जीओसी आणि श्रीनगरमध्ये तैनात होते. या बचाव मोहिमेत त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे.

टनेलिंग तज्ञ अर्नोल्ड डिक्स
उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात वैज्ञानिक संशोधक आणि भूमिगत बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्सही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी डिक्स बोगद्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी गेल्या 7 दिवसात सर्वांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. डिक्स भूमिगत बांधकामाशी संबंधित जोखमींबद्दल सल्ला देतात. हे बोगदे बनवणाऱ्या जगातील आघाडीच्या तज्ञांपैकी ते एक आहेत.

रॅट होल मायनिंग तज्ञांची टीम
मायक्रो-टनेलिंग, मॅन्युअल ड्रिलिंग आणि अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी मध्य प्रदेशातून सहा रॅट होल मायनिंग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या लोकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी टाकलेल्या अरुंद 800 मिमी पाईपचे निरीक्षण केले आहे. राज्य आणि केंद्रीय एजन्सीसह, स्थानिक ड्रिलिंग तज्ञ, पर्यावरण तज्ञ, NDRF आणि SDRF चे सदस्य तसेच भारतीय सैन्यानेदेखील या कामात महत्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Uttarakhand tunnel collapse: Rat hole experts to foreign engineers; Important role of 'these' people in saving 41 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.