"आमची अवस्था खूप वाईट, आम्हाला लवकर बाहेर काढा"; बोगद्यात अडकलेल्या मजुराची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 02:33 PM2023-11-21T14:33:20+5:302023-11-21T14:34:50+5:30
पाईपद्वारे अधिकार्यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अजूनही अडकले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. बचाव पथकाला अद्याप कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता वाढत आहे.
पाईपद्वारे अधिकार्यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अरुण कुमार यांच्यांशी मजुरांनी संवाद साधला. जे संभाषण झाले ते खूप चिंताजनक होतं. या बोगद्यात उत्तर प्रदेशातील 8 मजूरही अडकले आहेत. या मजुरांनी अरुण कुमार यांना येथील स्थिती अत्यंत वाईट असून त्वरीत बाहेर काढण्यास सांगितलं आहे.
"काळजी करू नका, हिंमत ठेवा"
मजुराशी संवाद साधताना अरुण कुमार त्यांना हिंमत देत म्हणाले, "काळजी करू नका, धीर धरा. संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. बचाव कार्य लवकरच यशस्वी होईल आणि आपण सर्व एकत्र घरी जाऊ." त्याचवेळी या संभाषणात उत्तर प्रदेशातील एका मजुराने अरुण कुमार यांना सांगितलं की, आम्हाला जेवण मिळत आहे, पण आम्हा सर्वांची अवस्था खूप वाईट आहे. बचाव कार्य कसं सुरू आहे? आम्हाला लवकर बाहेर काढा. दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.
आणखी एक मजूर राम सुंदरने आमच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगा असं म्हटलं आहे. या बोगद्यात विविध राज्यातील कामगार अडकले आहेत. या राज्यांच्या सरकारांनी त्यांचे प्रतिनिधी रेस्क्यू एजन्सीशी संवाद साधण्यासाठी पाठवले आहेत. अरुण कुमार मिश्रा हे त्यापैकीच एक आहेत, ज्यांना उत्तर प्रदेश सरकारने मजुरांची अवस्था आणि बचाव कार्याची चौकशी करण्यासाठी पाठवलं आहे.