गेल्या १३ दिवसांपासून उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता पाइप आणि कामगारांमध्ये काही मीटरचं अंतर उरलं आहे. यादरम्यान, घटनास्थळावर तैनात असलेल्या एनडीआरएफने मॉक ड्रिलच्या माध्यमातून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना कसं बाहेर काढलं जाईल, याची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बोगद्यात १३ दिवसांपासून अडकून असलेल्या ४१ मजुरांना एका मोठ्या पाईपच्या माध्यमातून एकएक करून चाकं असलेल्या स्ट्रेचरवरून बाहेर आणलं जाईल.
एनडीआरएफने आज बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठीच्या स्ट्रेचरच्या वापराचं मॉक ड्रिल करून दाखवलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एनडीआरएफचे कर्मचारी जेव्हा दोरी ओढतील तेव्हा मजुराला स्टेचरवर झोपवलं जाईल आणि स्ट्रेचर ओढून त्यांना बाहेर आणलं जाईल. उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी राबवण्यात येत असलेलं अभियान आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.
उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये बचाव मोहिमेदरम्यान, आलेले अडथळे दूर करण्यात आले आहेत. आता बोगद्यामध्ये पुन्हा ड्रिलिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे. आता गेल्या १३ दिवसांपासून आत अडकून पडलेल्या कामगारांची आज संध्याकाळपर्यंत सुखरूपपणे सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.