उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकले आहेत. जवळपास १३ दिवसांपासून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेलं बचावकार्य आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. तसेच लवकरच या कामगारांना बाहेर काढलं जाऊ शकतं. तसेच या कामगारांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कामगारांशी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. त्यासाठी चिन्यालीसोड रुग्णालयामध्ये व्यवस्था केली जात आहे.
दरम्यान, आज बचावकार्याच्या १३व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवाद साधत बचाव कार्याची माहिती घेतली आहे. तसेच बचाव कार्यात कुठलीही कमतरता राहू नये, तसेच कुठल्या मदतीची आवश्यकता असेल, तर सांगण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या १३ दिवसांपासून उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता पाइप आणि कामगारांमध्ये काही मीटरचं अंतर उरलं आहे. यादरम्यान, घटनास्थळावर तैनात असलेल्या एनडीआरएफने मॉक ड्रिलच्या माध्यमातून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना कसं बाहेर काढलं जाईल, याची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बोगद्यात १३ दिवसांपासून अडकून असलेल्या ४१ मजुरांना एका मोठ्या पाईपच्या माध्यमातून एकएक करून चाकं असलेल्या स्ट्रेचरवरून बाहेर आणलं जाईल.