उत्तरकाशीत हवामानाचा अडथळा, बोगद्याजवळ पडतोय पाऊस, अडकलेले 41 मजूर कधी बाहेर येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:49 PM2023-11-28T13:49:47+5:302023-11-28T13:51:10+5:30
एकीकडे बचाव पथक 41 मजुरांना वाचवण्यासाठी अविरत परिश्रम आणि ड्रिल करत असताना उत्तरकाशीमध्ये पाऊस सुरू झाला आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांदरम्यान थोडी चिंता वाढली आहे. एकीकडे बचाव पथक 41 मजुरांना वाचवण्यासाठी अविरत परिश्रम आणि ड्रिल करत असताना उत्तरकाशीमध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत बचाव कार्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, आज रात्रीपर्यंत मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, ही दिलासादायक बाब आहे.
उत्तरकाशीतील पावसादरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे आज रात्रीपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण होऊ शकतं, कारण आता मजूर आणि बचाव पथकामध्ये फक्त 5 मीटरचे अंतर उरलं आहे. आता बोगद्यात फक्त 5 मीटर मॅन्युअल ड्रिलिंगचे काम बाकी आहे, त्यानंतर 41 मजुरांना आपल्या कुटुंबीयांना भेटता येणार आहे.
मजुरांसाठी कपडे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय मजुरांच्या कुटुंबीयांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बचावानंतर मजुरांना रुग्णालयात नेण्यात येईल. हवामान खात्याने 28 नोव्हेंबरला उत्तरकाशीमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली होती.
उत्तरकाशी बोगदा रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे आणि आता ग्रीन कॉरिडॉरचा पहिला टप्पा बोगद्याच्या अगदी समोर सुरू होताना दिसत आहे. रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर जिथे पोहोचतील तिथे रस्त्याची डागडुजी केली जात आहे. माती, दगड टाकून रस्त्याची डागडुजी केली जात आहे. बचावकार्याच्या अंतिम टप्प्यातील त्यांच्या भूमिकेसाठी एनडीआरएफही आता पूर्णपणे तयार आहेत. बचावकार्य लवकरच पूर्ण होणार असून आता ग्रीन कॉरिडॉरमधून 41 मजुरांना रुग्णवाहिकेतून नेण्यात येणार आहे.