Silkyara Tunnel Rescue Operation: मागील दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणांकडून आतापर्यंत अनेक पर्याय वापरुन झाले आहेत. ड्रिलिंगदरम्यान ऑगर मशीनचा काही भाग अडकल्याने बचावकार्य मंदावले आहे.
मागील काही दिवसांपासून ड्रिलिंगचे काम सुरू होते, यासाठी अमेरिकन ऑगर मशीन वापरली जात होती. पण, शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रात्री ऑगर मशीनचे ब्लेड ढिगाऱ्यात अडकले. हे भाग काढण्यासाठी एक प्लाझ्मा मशीन हैदराबादहून एअरलिफ्ट करण्यात आली आहे. यात वेळ लागू शकतो, त्यामुळे आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्याय वापरला जात आहे.
रविवारी (26 नोव्हेंबर) बोगद्यात व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू झाले आहे. यात बोगद्याच्या वरुन उभे खोदकाम केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 15 मीटरचा एक भाग ड्रिल करण्यात आला आहे. कोणताही अडथळा न आल्यास या मार्गाने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 100 तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमकी घटना कसी घडली? उत्तराखंगडच्या उत्तरकाशीमध्ये चारधाम यात्रा मार्गावर बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी कोसळला होता. हा भाग कोसळल्यामुळे 41 कामगार बोगद्यातच अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. विविध विभाग मागील 15 दिवसांपासून एकत्रितपणे काम करत आहेत. पण, अद्यात त्यांना यात यश आले नाही.