उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अडकले होते. मंगळवारी सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं. 17 दिवस चाललेल्या या बचाव मोहिमेदरम्यान ऑस्ट्रेलियन टनल एक्सपर्ट अर्नाल्ड डिक्स चर्चेत होते. अर्नाल्ड डिक्स यांनी बोगद्याच्या सुरुवातीला असलेल्या मंदिरातील बाबा बौखनाग यांच्यासमोर प्रार्थना केली.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मिशनमध्ये एक चमत्कार घडला. अर्नाल्ड डिक्स हे स्थानिक देवता बाबा बौखनाग यांच्या मंदिरात प्रार्थना करताना दिसले. अर्नाल्ड डिक्स हे जिनेवामधील इंटरनॅशनल टनलिंग अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत आणि ते भूगर्भशास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि वकील देखील आहेत.
ते पुढे म्हणाले की, पालक म्हणून माझ्यासाठी हा सन्मान आहे की मी सर्व मुलांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांची मदत करत आहे. ख्रिसमसपर्यंत 41 लोक सुखरूप घरी परततील असं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. ख्रिसमस लवकरच येत आहे. यशाचं रहस्य सांगताना अर्नाल्ड म्हणाले की, "आम्ही शांत होतो आणि आम्हाला काय हवं आहे हे आम्हाला माहीत होते. आम्ही एक अद्भुत टीम म्हणून काम केलं."
"इंजिनिअर, सैन्य, ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट लोक, सर्व एजन्सी, अधिकारी… या यशस्वी मिशनचा एक भाग बनणे माझ्यासाठी आनंददायी होतं. हे मिशन आव्हानात्मक होतं. आपण या लोकांना घरी आणणार हे सगळ्यांनाच माहीत होतं."