उत्तरकाशी येथील बोगद्यात गेल्या काही दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत फळं, खिचडी, पाणी आणि ऑक्सिजन पोहोचवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत सहा इंच पाईपद्वारे पोहोचवल्या जात आहेत. याचाच अर्थ आता हा 6 इंची पाईप मजुरांची शेवटची आशा आहे. मजुरांच्या कुटुंबीयांनाही लवकरच मजूर बोगद्यातून बाहेर येण्याची यामुळे आशा निर्माण झाली आहे.
रेस्क्यू ऑपरेशन करत असणाऱ्या टीममध्ये दोन दिवसांपूर्वी 20 नोव्हेंबर रोजी 6 इंच पाईपद्वारे सर्व खाद्यपदार्थ मजुरांना पाठवले आहेत. मंगळवारी शाकाहारी पुलाव, मटार-पनीर आणि चपाती पाईपद्वारे मजुरांना रात्रीच्या जेवणासाठी पाठविण्यात आली. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगदा दुर्घटनेला 11 दिवस पूर्ण झाले आहेत. आतमध्ये अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
सफरचंद, संत्री, लिंबूपाणी, पाच डझन केळी बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांसाठी पाठवण्यात आली आहेत. बचाव कार्यात गुंतलेल्या NDMA ने मंगळवारी सांगितलं की, उत्तरकाशीच्या बोगद्यात टाकलेली 6 इंची पाईपलाईन पूर्णपणे कार्यरत आहे. सहा इंच पाईपलाईन टाकल्यानंतरच अनेक गोष्टी पाठवण्यात यश आलं. आता औषधांसोबत मीठ आणि इलेक्ट्रोलाइट पावडरची पाकिटेही मजुरांपर्यंत पोहोचवली आहेत.
बोगद्यातील मजुरांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाईपद्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवण्यात आला. यामध्ये बोगद्याच्या आतील परिस्थिती टिपण्यात आली. अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे मजुरांशी संवाद साधला. बोगद्याच्या आतून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्यांना 10 दिवस बोगद्यात कसे राहावे लागले हे दिसत आहे. मजुरांना वाचवण्यात सहभागी असलेले कर्नल दीपक पाटील यांनी सांगितलं होतं की, बोगद्यात अडकलेल्या लोकांना अन्न, मोबाईल आणि चार्जर पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतमध्ये वायफाय कनेक्शन लावण्याचेही प्रयत्न केले जातील.