उत्तराखंडमधील बोगद्यातून 17 दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या मजुरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधला. नरेंद्र मोदींनी युवा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडच्या सबा अहमद यांच्याशी चर्चा केली. मोदींनी सबा अहमद यांना सांगितलं की, मी माझा फोन स्पीकरवर ठेवला आहे, जेणेकरून माझ्यासोबत बसलेले लोकही तुम्ही काय म्हणताय हे ऐकतील.
पीएम मोदींनी सबा अहमद यांना सांगितलं की, सर्वात आधी मी तुमचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. इतक्या संकटानंतरही तुम्हाला बाहेर काढण्यात यश आलं. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. केदारनाथ बाबा आणि भगवान बद्रीनाथ यांच्या कृपेने तुम्ही सर्व सुखरूप आला आहात.
मोदी म्हणाले की, 16-17 दिवसांचा कालावधी कमी नाही. तुम्ही लोकांनी खूप हिंमत दाखवली. एकमेकांची हिंमत वाढवली. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्यात खूप धैर्य होता. मी सतत माहिती घेत होतो. मुख्यमंत्र्यांच्याही सतत संपर्कात होतो. माझे पीएमओ अधिकारी तिथे येऊन बसले होते. सर्व मजुरांच्या कुटुंबीयांचं पुण्य कामाला आलं. ज्यामुळे ते संकटातून बाहेर येऊ शकले.
पंतप्रधानांशी संवाद साधताना सबा अहमद म्हणाले की, "आम्ही इतके दिवस बोगद्यात अडकलो होतो, पण एक दिवसही थोडा अशक्तपणा आणि भीती वाटली नाही. बोगद्याच्या आत आमच्यासोबत असं काहीच घडलं नाही. तेथे 41 लोक होते आणि सर्वजण भावासारखे राहत होते. कुणाला काही झालं तरी आम्ही एकत्र राहायचो. कोणालाही कोणतीही अडचण येऊ दिली नाही."
"जेव्हा जेवण यायचं तेव्हा आम्ही एकत्र बसायचो आणि एकाच ठिकाणी जेवायचो. रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांना फिरायला जायला सांगायो. बोगद्याची लेन अडीच किलोमीटर लांब होती, त्यात आम्ही चालत असू. यानंतर सकाळी सगळ्यांना मॉर्निंग वॉक आणि योगा करायला सांगायचो. यानंतर आम्ही सर्वजण तिथे योगासने करायचो आणि फिरायला जायचो, जेणेकरून प्रत्येकाची तब्येत चांगली राहते."
फोरमॅन गब्बर सिंह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. मोदी म्हणाले की, गब्बर सिंह, मी तुमचे विशेष अभिनंदन करतो. मुख्यमंत्री मला रोज सांगायचे. तुम्ही दोघांनी दाखवलेलं नेतृत्व आणि तुम्ही दाखवलेली सांघिक भावना खूप महत्त्वाची आहे. मोदी म्हणाले की, तुमच्या सर्वांच कुटुंबीय खूप चिंतेत होते. संपूर्ण देशातील 140 कोटी जनता चिंतेत होती. तुमच्या कुटुंबातील सदस्यही अभिनंदनास पात्र आहेत, ज्यांनी अशा कठीण काळात संयम बाळगला आणि पूर्ण सहकार्य केले.