डोंगरावरून सुरू झाले ड्रिलिंग; सुटकेसाठी १०० तासांचे मिशन, पहिल्याच दिवशी १९.२ मीटर भाग खाेदण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 08:02 AM2023-11-27T08:02:04+5:302023-11-27T08:03:38+5:30
Uttarkashi Tunnel Accident: मागील १५ दिवसांपासून बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता डोंगराच्या माथ्यावरून खोदकाम सुरू झाले. यात कोणताही अडथळा न आल्यास कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास १०० तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तरकाशी - मागील १५ दिवसांपासून बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता डोंगराच्या माथ्यावरून खोदकाम सुरू झाले. यात कोणताही अडथळा न आल्यास कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास १०० तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आडवी ड्रिलिंग करणारी अमेरिकन ऑगर मशिन तुटल्यानंतर एक दिवसाने वरून ड्रिलिंग सुरू करण्यात आले. त्यानुसार रविवारी १९.२ मीटरचा भाग ड्रील करण्यात आल्याचे एनएचआयडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितले.
लष्कराचे पथकही बचावकार्यात
ऑगर मशिनचे ढिगाऱ्यात अडकलेले भाग काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा मशीन आणण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या ‘कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्स’चा एक गट बचावकार्यात मदत करण्यासाठी रविवारी पोहोचला. त्यानुसार, बचावकार्य सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स म्हणाले.