उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरूच आहे. दुर्घटना होऊन 72 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात अद्याप यश आलेलं नाही. याच दरम्यान, मंगळवारी बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह या मजुराने आपल्या मुलाशी वॉकीटॉकीवरून संवाद साधला आहे.
सर्व मजुरांची जबाबदारी माझ्यावर असल्याचं ते म्हणाले. सर्वांना बाहेर काढल्यानंतरच मी बाहेर येईन असंही सांगितलं. गब्बर सिंह हे सुपरवायझर आहेत.उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले गब्बर सिंह नेगी यांनी आपल्या मुलाशी संवाद साधला आणि इतर मजूर सुरक्षित असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे पुरेसं अन्न आणि पाणी आहे. आता ते बाहेर येण्याची वाट पाहत आहेत असं म्हणाले.
सर्व कामगार सुरक्षित आहेत
नेगी यांचा मुलगा आकाशने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पुरवठा करणार्या पाईप्सद्वारे मला काही सेकंद वडिलांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. ते सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले. काळजी करू नका, कारण सर्व ते मजुरांसोबत आहेत.
पोलिसांनी दिली परवानगी
अपघातस्थळी उपस्थित असलेले आकाशचे काका महाराज सिंह नेगी म्हणाले की, सुरुवातीला आम्हाला आत अडकलेल्या लोकांशी बोलण्याची परवानगी पोलिसांनी दिली नाही. जेव्हा मी इन्स्पेक्टरला समजावून सांगितलं की एका नातेवाईकाकडून ऐकून अडकलेल्या मजुरांना तसेच संबंधित कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या सुरक्षित बचावाची आशा बळकट होईल, तेव्हा त्यांनी होकार दिला आणि मी आकाशला त्याच्या वडिलांशी बोलण्यासाठी पाठवलं.
अधिकाऱ्यांनी महाराज सिंह नेगी यांना काळजी करू नका, कारण बोगदा साफ झाला आहे आणि कामगार ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणापासून ते 2 किलोमीटर दूर आहेत असं म्हटलं आहे. रविवारी, 12 नोव्हेंबरच्या पहाटे ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सिल्कियारा-बरकोट बोगद्याचा काही भाग अचानक कोसळला, ज्यामध्ये 40 मजूर आत अडकले. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.