आमच्या माणसांना बाहेर काढा..., उत्तराखंडमधील दुर्घटनास्थळी आंदोलन, कामगारांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 04:56 PM2023-11-15T16:56:59+5:302023-11-15T16:57:06+5:30
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दगडमातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातानंतर सुमारे ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंडमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दगडमातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातानंतर सुमारे ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा हा चौथा दिवस आहे. दरम्यान, बचाव मोहीम लांबत असल्याने कामगारांचा संयम सुटत असू, दुर्घटनास्थळावर कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या सहकाऱ्यांना लवकरात लवकर बाहेर काढा, अशी मागणी करत या कामगारांनी बचाव अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कोसळत असलेल्या मातीमुळे दोन बचाव कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तिथेच तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ड्रिलिंग प्रक्रिया मंगळवारी रात्री १० सुरू झाली. मात्र त्यामध्ये सुरुवातीला वापण्यात आलेली बरमा मशीन अपेक्षित परिणाम देऊ शकली नाही. या मशिनीमध्ये मातीच्या ढिगाऱ्याने भरलेल्या भागात नेव्हिगेट करण्याची क्षमता नव्हती.
ढिगारा हटवण्यासाठी दिल्लीमधून एक पर्यायी मशीन, अमेरिकन ऑगर मागवण्यात आली आहे. ही आधुनिक मशीन अधिक क्षमतेने काम करते. तसेच प्रति तास ५ मीटर या वेगाने ड्रिलींग करण्यास सक्षम आहे. अमेरिकी बरमा दुपारच्या दरम्यान, उत्तरकाशीमध्ये पोहोचली आहे. भारतीय हवाई दलाचे सी-१३० हर्क्युलस विमान दुर्घटनास्थळापासून सुमारे ३० ते ३५ किमी अंतरावर मशिनीसह उतरले आहे.