नवी दिल्ली/उत्तरकाशी - उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी डोंगरावरून ड्रिलिंग सुरू असताना लवकरच हाताने खोदकाम करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिली.ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आता हाताने खोदकाम केले जाणार आहे. ऑगरने ४६.८ मीटरपर्यंत आडवे खोदकाम करण्यात आले होते. उभे आणि हाताने खोदकाम करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले जात आहे. बोगद्याच्या बारकोटच्या टोकापासून आडवे ड्रिलिंग करण्याचा पर्यायांवरही विचार केला जात आहे.
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांचा आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी सोमवारी सिलक्यारा बोगदा गाठत गेल्या दोन आठवड्यांपासून अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. मिश्रा यांनी बचावकार्याची गुंतागुंत समजून घेतली आणि अधिकारी, अभियंते आणि कामगारांशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिले.
‘बांधकामाशी संबंध नाही’बोगद्याच्या बांधकामात आमचा सहभाग नाही. बांधकामातील कंपनीमध्ये समूहाची भागीदारी नाही, असे उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने स्पष्ट केले. बांधकामात समूहाचा सहभाग असल्याचा संशय समाजमाध्यमांवर व्यक्त केला जात असताना अदानी समूहाने हे स्पष्टीकरण दिले.
८६ मीटर उभे ड्रिलिंग बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणार आहेत. १.२ मीटर व्यासाचा पाइप बोगद्याच्या वरून खालपर्यंत उभा घातला जाईल.
‘रॅट-होल’ खाण कामगार लवकरच हाताने खोदण्यास सुरुवात करतील. ऑगर मशीनचे तुटलेले भाग काढण्यात आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक संस्था बचावकार्यात आहेत.-सय्यद अता हसनैन, सदस्य, एनडीएमए