आशेचा किरण! 40 रुग्णवाहिका, गॅस मास्क, डॉक्टर्स, हेलिकॉप्टर; बचाव मोहीम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:15 AM2023-11-23T10:15:35+5:302023-11-23T10:19:26+5:30
ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, स्ट्रेचरपासून ते बीपी उपकरणांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत यंत्रे बोगद्याच्या बाहेर आहेत.
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या बचाव कार्याचा आज 12 वा दिवस असून रात्री उशिरा ड्रिलिंग सुरू असताना अनेक अडचणी आल्या. ऑगर मशीनचा बिट खराब झाला. ऑगर मशिनचा बिट दुरुस्त करण्याचे यंत्र हेलिकॉप्टरने आणण्यात आले. अशा परिस्थितीत बचावकार्य आता अंतिम टप्प्यात असून, त्यादृष्टीने रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
एनडीआरएफची टीमही घटनास्थळी उपस्थित आहे. बचाव कार्यासाठी, एनडीआरएफ अतिरिक्त स्ट्रेचर तयार करत आहे ज्यामध्ये बेरिंग आणि चाकं बसवली जात आहेत जेणेकरून मजुरांना लांब पाईपमधून स्ट्रेचरद्वारे बाहेर काढता येईल. ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, स्ट्रेचरपासून ते बीपी उपकरणांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत यंत्रे बोगद्याच्या ठिकाणी आहेत. एनडीआरएफ बचाव कर्मचारी गॅस मास्क आणि स्ट्रेचरसह आत जात आहेत. रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत.
रुग्णवाहिकेचे कर्मचारी सदस्य हरीश प्रसाद म्हणाले, "सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्याकडे 40 रुग्णवाहिका येथे तैनात असतील. बोगद्याच्या बाहेर 15 डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे." एनडीआरएफची टीम आधीच घटनास्थळी हजर असून बचाव आणि मदतकार्यात गुंतलेली आहे. पाईप बोगद्याच्या आत जाताच एनडीआरएफचे जवान बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढतील.
बोगद्याच्या बाहेर प्राथमिक उपचाराची तयारीही जोरात करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या टीमने मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी चाकं आणि बेरिंग बसवलेले खास स्ट्रेचर घेतले आहेत. मजुरांच्या शारीरिक स्थितीमुळे त्यांना 60 मीटरपर्यंत चालता येणार नाही, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे चिन्यालीसौरच्या आरोग्य केंद्रात नेण्यात येईल. चिन्यालीसौरमध्ये 41 बेडचा विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याठिकाणी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले असून ते मजुरांच्या आरोग्याची तपासणी करतील आणि गरज भासल्यास त्यांना उपचारासाठी अन्य ठिकाणी पाठवले जाईल.