उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेला सिलक्यारा बोगदा ढासळल्याने ४० कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. या गेल्या पाच दिवसांपासून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. ४० जणांना वाचवण्यासाठी बोगद्यात पडलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यामध्ये बोरिंगचं काम वेगाने सुरू आहे. मात्र हे काम सुरू असतानाच बोरिंग मशीन दुसऱ्या एका मशीनवर आदळल्याने हे काम थांबवावं लागलं आहे. सुमारे २४ मीटर बोरिंग केल्यानंतर काम थांबवावं लागलं आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे.
सिलक्यारा बोगद्यामध्ये कार्यरत असलेल्या शक्तिशाली ऑगर मशीनने शुक्रवारी सकाळपर्यंत २४ मीटर अंतर पार केले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अडकून पडलेले कामगार लवकरात लवकर बाहेर येण्याची शक्यता वाढली होती. मात्र २४ मीटर अंतर पार झाल्यावर बोरिंगचं काम थांबवावं लागलं.
सिलक्यारा येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्तरकाशी जिल्हा आपातकालिन परिचालन केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार बोगद्यामध्ये जमा झालेल्या ढिगाऱ्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत २४ मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले होते. बोगद्यामध्ये सुमारे ४५ ते ६० मीटरपर्यंत दगडमातीचा ढिग जमा झालेला आहे. त्यामध्ये ड्रिलिंग करायचं बाकी आहे.
हा संपूर्ण ढिगारा लवकर बाहेर काढता येणार नसल्याने त्यामध्ये ८०० मिमी आणि ९०० मिमी व्यासाचे पाईप एका पाठोपाठ एक टाकून ढिगाऱ्यापलिकडे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी ऑगर मशीनच्या माध्यमातून ड्रिलिंग सुरू करण्यात आली होती. मात्र भूस्खलन झाल्याने काम मध्येच थांबवावं लागलं होतं. त्यानंतर ऑगर मशीनही खराब झाली होती. नंतर भारतीय हवाई दलाच्या सी-१३० हर्क्युलस विमानांमधून मोठी आणि अत्याधुनिक अमेरिकन ऑगर मशिन दोन भागांमध्ये घटनास्थळी पाठवण्यात आली. तिच्या माध्यमातून गुरुवारी नव्याने ड्रिलिंग सुरू झालं होतं.
दरम्यान, आत अडकलेल्या कामगारांसोबत सातत्याने संवाद साधला जात आहे. त्यांचं अधुनमधून त्यांच्या नातेवाईकांशीही बोलणं घडवून आणलं जात आहे. उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. सी. एम पवार यांनी सांगितले की, बोगद्याजवळ एक सहा बेडचं तात्पुरतं रुग्णालय उभं करण्यात आलं आहे. तसेच घटनास्थळावर कामगारांना बाहेर काढल्यावर त्वरित उपचार मिळावेत यासाठी १० रुग्णवाहिकांसह मेडिकल टीमसुद्धा उपस्थित आहे.