उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 17 दिवसांनी आज बाहेर काढण्यात येणार आहे. मजुरांचं पुष्पहार घालून स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मजुरांचे कुटुंबीय देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. मजूर बाहेर पडताच त्यांच्या कुटुंबियांना भेटतील. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित आहेत. बोगद्यात डॉक्टरांचं एक पथकही आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत. सर्व मजूर बाहेर आल्यावर पुढचा प्लॅन काय ते जाणून घेऊया...
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांची नीट काळजी घेतली जाईल. मजुरांना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्यात येईल. त्यासाठी त्यांची प्रकृती आणि स्थिती लक्षात घेऊन हवाई आणि रस्ते वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी घटनास्थळापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिन्यालीसौर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये 41 बेडचं रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.
डॉक्टरांची टीम घटनास्थळी आहे. प्रत्येक मजुरासाठी एक अशा 41 रुग्णवाहिका आणि कोणालाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास दोन हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय गरज पडल्यास हवाई दलालाही सहभागी करून घेतले जाईल. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मजुरांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिन्यालीसौर येथे एक चिनूक हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले आहे.
अधिकारी पुढे म्हणाले की, इतके दिवस बंदिस्त जागेत अडकल्यामुळे मजुरांना मानसिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ गेल्या काही दिवसांपासून मजुरांच्या संपर्कात आहेत. बचावानंतर त्यांचं योग्य समुपदेशनही केलं जाईल.17 दिवस अंधारात राहून बाहेर पडणाऱ्या कामगारांना बाहेरच्या प्रकाशाचा परिणाम होऊ नये म्हणून गॉगल लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.