गेल्या २ आठवड्यांपासून बोगद्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुरांवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. आज सकाळपर्यंत या मजुरांपर्यंत पोहोचण्याची तयारी करण्यात आली होती. अॅम्बुलन्स, डॉक्टरांच्या टीम आदी सर्व त्या ठिकाणी तयारीत ठेवण्यात आले होते. परंतू, एक सळी आड आली आणि सर्व प्रयत्न पुन्हा थांबले आहेत. छेद पाडून पाईप टाकणारी मशीनच यामुळे नादुरुस्त झाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी दिल्लीवरून सात जणांची टीम पाठविण्यात आली आहे.
सिलक्यारा टनलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. परदेशातून मशीन आणण्यात आल्या आहेत. मोठ्या आकाराचा पाईप टाकून त्याद्वारे या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतू, हा पाईप टाकत असताना ऑगर मशीनला बोगद्यातील ३० मीमीची लोखंडी सळई आडवी आली आहे. यामुळे हा पाईपदेखील वाकडा झाला आहे. तसेच मशीनवर लोड आल्याने ती देखील नादुरुस्त झाली आहे.
रात्रीच्या १ वाजेच्या सुमारास ही सळई पाईपवर आदळली आहे. यामुळे मशीन बंद आहे. सकाळी ८ वाजण्य़ाच्या सुमारास हे काम पूर्ण होऊन आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले जाणार होते. एनडीआरएफच्या टीमने ऑगर मशीनला अडथळा ठरलेली सळी कापली आहे. मशीन दुरुस्त होताच ८०० मीमीचा पाईप आत अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.
जो पाईप टाकला जात होता तो दहावा होता. त्याचा पुढील भाग चेपला आहे. आता हा चेपलेला भाग कापण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी ९ पाईप टाकण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह हे देखील सिल्कियारा बोगद्याजवळ पोहोचणार आहेत. धामी उत्तरकाशीमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.. ते बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्याचे क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. केंद्रीय मंत्रीही येथे दाखल झाल्याची माहिती आहे.