उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्याची धडपड सुरू आहे. मंगळवारी, बोगद्याच्या आतून मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये सर्वजण सुरक्षित दिसत आहे. यातील अनेक मजुरांचे नातेवाईक बोगद्याच्या बाहेर उपस्थित असून त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. बुधवारीही मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधायला दिला. ज्यामध्ये एका मजुराने मोबाईल चार्जर आत पाठवण्यास सांगितलं आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांपैकी एक पुष्कर सिंह येरी यांचा भाऊ विक्रम सिंह येरी यांनी बुधवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्याचं पुष्करशी बोलणं झालं आहे. तो म्हणाला मी ठीक आहे. तुम्ही लोक घरी जा. मी येईन. फळं व इतर खाद्यपदार्थ पाईपद्वारे पाठवले जात आहेत. त्याने मोबाईल चार्जर मागितला आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी सहा इंचाचा पाईप टाकण्यात आला. सहा इंचाचा पाईप टाकण्यापूर्वी चार इंच पाईपद्वारे मजुरांना अन्न, पाणी, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. आता या पाईपद्वारे मजुरांचे नातेवाईक आणि बचाव कर्मचारी आत अडकलेल्या लोकांशी बोलत होते.
मोदी घेत आहेत माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. उत्तरकाशी जिल्ह्यातील चारधाम यात्रा मार्गावर निर्माणाधीन साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा एक भाग 12 नोव्हेंबरला कोसळला होता, त्यामुळे कामगार ढिगाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.