उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी दहा दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यात व्यस्त असलेल्या यंत्रणांना सोमवारी मोठं यश मिळालं. पहिल्यांदाच मजुरांसाठी खिचडी पाठवण्यात आली. हे अन्न 6 इंच रुंद पाईपद्वारे बाटल्यांमध्ये भरून मजुरांना पाठवलं. याच दरम्यान, बोगद्याच्या आतील व्हिडिओही पहिल्यांदाच समोर आला आहे. बोगद्यात मजूर कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे पाहता येईल. बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे मजुरांशी संवादही साधला.
बोगद्यातील कामगार आणि लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाईपद्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवण्यात आला आहे. यामध्ये बोगद्याच्या आतील परिस्थिती टिपण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीच्या माध्यमातून मजुराशी संवाद साधला. बोगद्याच्या आतून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्यांना 10 दिवस बोगद्यात कसे राहावे लागले हे दिसून येते. मजुरांना वाचवण्याच्या कामात सहभागी असलेले कर्नल दीपक पाटील यांनी आम्ही बोगद्यात अडकलेल्या लोकांसाठी अन्न, मोबाईल आणि चार्जर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत वायफाय कनेक्शन स्थापित करण्याचा प्रयत्न करू. डीआरडीओचे रोबोटही काम करत आहेत असं सांगितलं.
सोमवारी रात्री बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 24 बॉटल भरून खिचडी पाठवण्यात आली. 9 दिवसांनंतर पहिल्यांदाच मजुरांना पोटभर जेवण मिळालं. याशिवाय संत्र, सफरचंदाचा ज्यूस आणि लिंबूपाणी पाठवण्यात आलं. आजही इतर खाद्यपदार्थ मजुरांना पाठवलं जाील. आत्तापर्यंत फक्त मल्टी व्हिटॅमिन्स आणि ड्रायफ्रूट्स पाईप्सद्वारे पाठवले जात होते. हे अन्न 6 इंच रुंद पाईपद्वारे मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आले.
बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यासाठी 5 प्लॅन करण्यात आले आहेत. सध्या एजन्सी दोन प्लॅनवर काम करत आहे. पहिलं अमेरिकन ऑगर मशीन बोगद्याच्या ढिगाऱ्यात 800-900 मिमी स्टील पाईप टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून या पाईपच्या मदतीने मजुरांना बाहेर काढता येईल. ऑगर मशिनच्या सहाय्याने 24 मीटर खोदकामही करण्यात आले. मात्र, मशीनमध्ये बिघाड झाला. यानंतर काम थांबले. आज पुन्हा ऑगर मशिनद्वारे ड्रिलिंग सुरू होण्याची शक्यता आहे.