बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:52 PM2023-11-29T12:52:15+5:302023-11-29T12:53:01+5:30

जेव्हा मुलगा बोगद्यात अडकल्याचं कळाले तेव्हापासून वडील चिंतेत होते.

Uttarkashi Tunnel Jharkhand Jamshedpur Son Came Out Before That Father Died Of Shock While Waiting On Way | बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला

बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात बोगद्यात अडकलेले ४१ कामगार आता सुखरुप बाहेर आले आहेत. या कामगारांच्या भेटीसाठी गेल्या १७ दिवसांपासून त्यांचे कुटुंब प्रतिक्षा करत होते. १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी या कामगारांची सुटका करण्यात आली त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. परंतु या ४१ कामगारांपैकी १ असा कामगार होता जो बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. या कामगाराचे नाव भत्त्कू मुर्मू असं आहे. तो झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील राहणारा होता. 

भत्त्कू जेव्हा मंगळवारी २८ नोव्हेंबरच्या रात्री सिलक्यारा बोगद्यातून सुखरुप बाहेर पडला.तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. वडिलांच्या मृत्यूनं भत्त्कू धाय मोकलून रडला. मागील १७ दिवसापासून तो बोगद्यात अडकलेला असताना जेव्हा मी बाहेर पडेन तेव्हा घरच्यांना भेटेन, वडिलांना बघेन असं त्याला वाटत होते. परंतु नियतीनं वेगळाच डाव त्याच्यासमोर मांडला होता. बोगद्यात भत्त्कूशिवाय सिंहभूम जिल्ह्यातील डुमरिया येथील ६ अन्य कामगार होते. 

रिपोर्टनुसार, २९ वर्षीय भत्त्कू सिंहभूम येथील बांकीशील तालुक्यातील बाहदा गावचा रहिवाशी होता. त्याचे ७० वर्षीय वडील बारसा मुर्मू गावातच होते. जेव्हा मुलगा बोगद्यात अडकल्याचं कळाले तेव्हापासून ते चिंतेत होते. मंगळवारी सकाळी नाश्ता करून ते खाटेवर मुलाच्या सुखरुप येण्याकडे वाट पाहत होते.तेव्हा अचानक ते खाटेवरून खाली पडले आणि त्यांचा जीव गेला. बारसा मुर्मू यांनी मुलाच्या आठवणीत जीव तोडला असं गावकरी म्हणतात. जेव्हा मुलगा बोगद्यात अडकला तेव्हापासून वडील निराश होते, त्यांना प्रचंड चिंता लागली होती असं बारसा मुर्मू यांच्या जावयाने म्हटलं. 

बोगद्याच्या कामासाठी भत्त्कू इतर सहकाऱ्यांसोबत उत्तराखंडला गेला होता. त्याच्यासोबत सहकारी सोंगा बांडरा हादेखील होता. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बांडरा बाहेर होता. अपघातानंतर सोंगाने लगेच भत्त्कूच्या घरी फोन करून तो बोगद्यात अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर घरातील सगळेच चिंताग्रस्त झाले. भत्त्कूच्या वडिलांनी या घटनेचा धसकाच घेतला. ते मुलगा कधी बाहेर येईल यासाठी चिंता करत बसले असंही जावयानं सांगितले. तर अपघात १२ नोव्हेंबरला झाला परंतु इतके दिवस एकानेही बारसा मुर्मू यांचा दरवाजा ठोठावला नाही. कुणीही अधिकारी भेटायला आले नाही. प्रत्येक दिवशी कुटुंबाला निराशाजनक बातम्या मिळत होत्या. ज्यामुळे बारसा मुर्मू यांची चिंताही वाढत चालली होती. त्याच चिंतेत अखेर मुलाच्या प्रतिक्षेत बापानं जीव सोडला त्यामुळे गावकरीही हळहळले. 

Web Title: Uttarkashi Tunnel Jharkhand Jamshedpur Son Came Out Before That Father Died Of Shock While Waiting On Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.