Uttarkashi Tunnel News: मागील 17 दिवसांपासून उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात 41 कामगार अडकले आहेत. आज त्यांचे बचावकार्य अंतिम टप्प्यात असून, लवकरच हे सर्व कामगार सुखरुप बाहेर येतील. कामगारांना बाहेर काढण्याचे काम एवढे अवघड होते की, यासाठी तब्बल 17 दिवस लागले. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे कामगार बोगद्यात नेमके अडकले कसे?
12 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे कामगारांचे काम सुरू होते. पहाटे साडेपाच वाजता अचानक दरड कोसळण्यास सुरुवात झाली, अनेक कामगार बाहेर पडले. पण, अचानक बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि 41 कामगार बोगद्यातच अडकले. हे कामगार सिल्क्यरा टोकावरून आत गेले होते.
ज्या बोगद्यात ते अडकले होते, त्याचा 2340 मीटरचा भाग पूर्ण झाला आहे. दरड कोसळल्यामुळे बोगद्यातील 200 मीटरचा भाग बंद झाला. तसेच, या ढिगाऱ्याचीच लांबी सुमारे 60 मीटर असल्यामुळे, कामगार बोगद्यात एकूण 260 मीटर अंतरावर अडकले. बोगद्यात या मजुरांना जाण्यासाठी मागे दोन किलोमीटरचा परिसर आहे. हे लोक 50 फूट रुंद आणि दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर फिरू शकतात.
आत अडकलेल्या कामगारांना तणावमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने बाहेरून अनेक पद्धती अवलंबल्या. वेळ घालवण्यासाठी आणि कामगारांना व्यस्त ठेवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ बोगद्याच्या आत पाठवले गेले. कामगारांना तणावमुक्त ठेवण्यासाठी योगासने करण्याचा सल्ला देण्यात आला. कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत राहावे यासाठी सरकारने त्यांना फोनही पाठवले. शनिवारी (26 नोव्हेंबर) कामगारांना गेम खेळण्यासाठी मोबाईलही पाठवण्यात आले, जेणेकरून त्यांना तणावमुक्त राहता येईल.
बोगद्यात अडकलेले कामगार कोणत्या राज्याचे?बोगद्यात विविध राज्यातील 41 कामगार अडकले आहेत. यात, उत्तराखंड-2, हिमाचल प्रदेश-1, उत्तर प्रदेश-8, बिहार-5, पश्चिम बंगाल-3, असाम-2, झारखंड-15 आणि ओडिशा-5 या राज्यातील कामगार आहेत.