Silkyara Tunnel Labourers Story: सूमारे दोन महिन्यांपूर्वी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी भागातील सिल्क्यरा बोगद्या कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते. सतरा दिवस चाललेल्या बचावकार्यानंतर त्या कामगारांना वाचवण्यात यश आले. या घटनेनंतर कामगार कामावर परतणार नाहीत, असे सर्वांना वाटत होते. पण, आता परिस्थिती सामान्य झाली आहे. सर्व कामगारदेखील कामावर परतले आहेत.
भीतीपोटी काम थांबणार नाहीमीडिया रिपोर्ट्सनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या आठवड्यात बोगद्याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता हळुहळू कामगार आपापल्या कामावर परत येत आहेत. या बोगद्यात अडकलेल्या मजुरांपैकी बंगालचे रहिवासी असलेले माणिक तालुकदार यांनी म्हटले की, ती दुर्घटना अत्यंत भीषण होता. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही भीतीपोटी काम करणे थांबवू.
कठीण काळात साथ सोडणार नाहीमाणिक तालुकदार पुढे म्हणाले की, आम्हाला आमच्या नोकरीतील धोके आधीच माहीत आहेत. आमची कंपनी आणि सरकारने आम्हाला कठीण काळात साथ दिली. आता आम्ही अशा कठीण काळात त्यांची साथ सोडणार नाही. तो प्रकल्प वेळेत पूर्ण करणार. आमचे इतर सहकारीदेखील लवकरच कामावर परतणार आहेत.
सुरक्षा व्यवस्था वाढवल्याबिहारचे रहिवासी असलेले आणि नुकतेच सिल्क्यरा येथे परतलेले दीपक श्रीवास्तव यांनी बोगद्याचे काम पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दीपक म्हणाले की, सुरुवातीला मला परतताना संकोच वाटत होता. कुटुंबीयांनीही परत न जाण्यास सांगितले होते. मात्र, इथे परत आल्यावर माझ्या मनातून सर्व तणाव निघून गेला. बोगद्यामध्ये सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत एजन्सी पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहेत.