"देवाने आमचं ऐकलं, माझा मुलगा..."; बोगद्यात अडकलेल्या मजुराची आई झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:33 PM2023-11-28T17:33:49+5:302023-11-28T17:40:49+5:30

अखिलेशच्या आईने सकाळी फोनवर त्यांचं मुलाशी बोलणं झालं होतं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत बाहेर येईन असं सांगितल्याचं म्हटलं आहे. 

uttarkashi tunnel rescue workers evacuated mirzapur akhilesh family emotional | "देवाने आमचं ऐकलं, माझा मुलगा..."; बोगद्यात अडकलेल्या मजुराची आई झाली भावूक

"देवाने आमचं ऐकलं, माझा मुलगा..."; बोगद्यात अडकलेल्या मजुराची आई झाली भावूक

उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांमध्ये यूपीच्या मिर्झापूरचा रहिवासी अखिलेश कुमार याचाही समावेश आहे. गेल्या 17 दिवसांपासून तो बोगद्यात अडकला होता. याच दरम्यान, आता सर्व कामगार बाहेर पडणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सर्वजण टीव्हीसमोर बसून बचावकार्य लाइव्ह पाहत आहेत. अखिलेशच्या आईने सकाळी फोनवर त्यांचं मुलाशी बोलणं झालं होतं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत बाहेर येईन असं सांगितल्याचं म्हटलं आहे. 

अखिलेश कुमारची आई अंजू देवींच्या चेहऱ्यावर हसू परत आलं आहे. "मी आज माझ्या मुलाशी फोनवर बोलले. त्याने आज तो बाहेर येणार असल्याचं सांगितलं. माझा मुलगा सुखरूप परत येईल यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. आज सकाळपासून आम्ही टीव्हीसमोर बसलोय. घरातील सर्वजण खूप आनंदी आहोत. जेव्हापासून तो बोगद्यात अडकला होता, तेव्हापासून दररोज पूजा करून त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. मी रात्रंदिवस देवाची प्रार्थना करत होते. अखेर आज देवाने माझे ऐकले."

अंजू देवी यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने सांगितलं होतं की, फक्त थोडच खोदकाम बाकी आहे. हे ऐकून आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण एवढ्या खोदकामात जास्त वेळ लागणार नव्हता. सध्या अखिलेश यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी आहे. अखिलेशचे वडील रमेश कुमार म्हणतात की, "ही खूप आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण गाव आनंदी आहे. मुलगा बाहेर आल्यानंतर आनंद साजरा करू. फटाके फोडणार. दिवाळीसारखा सण साजरा करणार. कारण, गेले 16 दिवस खूप कठीण गेले. प्रत्येक क्षण माझ्या मुलाची वाट पाहिली. आज देवाने माझी इच्छा पूर्ण केली."

अखिलेश कुमार हा अदलहाट पोलीस स्टेशन परिसरातील घरवासपूर गावचा रहिवासी आहे. उत्तरकाशी येथील नवयुवा कन्स्ट्रक्शन कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो सुपरवायझरचं काम करत होता. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग अचानक तुटला तेव्हा तोही आत अडकला. अखिलेशची पत्नी गरोदर आहे. तिला धक्का बसू नये म्हणून याबाबत माहिती दिली नव्हती. मात्र पत्नीला आज या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली.
 

Web Title: uttarkashi tunnel rescue workers evacuated mirzapur akhilesh family emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.