मृत्यूशी झुंज! 48 तासांनंतरही बोगद्यात अडकलेत 40 मजूर; जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:57 AM2023-11-14T10:57:24+5:302023-11-14T10:58:27+5:30
48 तास उलटले तरी अद्याप कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी विविध मार्गांनी संपर्क साधला जात आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, 48 तास उलटले तरी अद्याप कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी विविध मार्गांनी संपर्क साधला जात आहे. बचाव कार्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व कामगार सुरक्षित असल्याचं मदतकार्य करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे.
बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न वेगाने करण्यात येत आहेत. हा बोगदा बांधणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे की, बोगद्याच्या आतून 'शॉटक्रेटिंग' (काँक्रीट स्प्रे) टाकून माती काढली जात आहे. तर 'हायड्रॉलिक जॅक'च्या मदतीने आतमध्ये 900 मिमी व्यासाचा स्टील पाइप टाकण्याची योजना आखली जात आहे, जेणेकरून बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवता येईल. आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजीत कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, बचाव कार्य लवकरच पूर्ण केले जाईल आणि सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढलं जाईल.
48 तासांत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
- 25 मीटरपर्यंत मातीचा ढिगारा हटवण्यात आला.
- 40 मजुरांपर्यंत अन्न पोहचवण्यात आलं.
- ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आलं.
- खोदकाम सुरू असताना काही भाग कोसळला.
- पीएम नरेंद्र मोदींनी सीएम पुष्कर सिंह धामी यांच्याकडून माहिती घेतली.
- हायड्रॉलिक जॅकद्वारे स्टील पाईप टाकण्यात येत आहे.
- पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- एनडीआरएफ-एसडीआरएफ टीम घटनास्थळी आहेत.
- वॉकीटॉकीच्या माध्यमातून मजुरांशी संवाद साधला.
उत्तरकाशी बोगद्यात सुरू असलेल्या बचाव मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मोदींनी सीएम पुष्कर सिंह धामी यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. सीएम धामी देखील घटनेची माहिती घेत आहेत. सीएम धामी दुर्घटनेच्या 24 तासांनंतर सोमवारी घटनास्थळी पोहोचले.